गावागावांत शेत रस्ते, पाणंद रस्ते तयार करण्यासाठी ‘मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना’

मुंबई :

राज्यभरात गावागावांत शेत रस्ते, पाणंद रस्ते तयार करण्यासाठी ‘मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना’ राबविण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला असून या योजनेनुसार राज्यात दोन लाख किमीचे रस्ते बांधण्यात येणार आहेत.

शेतकरी आणि गावकरी समृद्ध व्हावेत या दृष्टिकोनातून मी समृद्ध तर गाव समृद्ध आणि गाव समृद्ध तर माझा महाराष्ट्र समृद्ध ही संकल्पना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गॅरंटी योजनेच्या (मनरेगा) व राज्य रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे.

राज्यात पालकमंत्री शेत, पाणंद रस्ते योजना राबविण्यात येत आहे. ही योजना राबविताना येणाऱ्या अडचणी दूर करून या योजनेतील कामांसाठी मनरेगामधून आवश्यक निधी उपलब्ध व्हावा यासाठी मनरेगा आणि राज्याची रोहयो यांचे एकत्रीकरण करण्यात आले आहे.

या योजनेतून शेत-पाणंद रस्ते बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात शेत-पाणंद रस्त्यांची मोठय़ा प्रमाणावर गरज आहे. रस्त्यांअभावी शेतकऱ्यांना तयार पीक बाहेर काढून साठवणे व बाजारात विकणे अवघड जाते. पावसाळ्यातील पिके आर्थिकदृष्टय़ा फायदेशीर असली तरी रस्त्याअभावी ती पिकविण्याचा विचार करता येत नाही. पाणंद रस्ते नसल्यामुळे शेतकऱ्यांना विविध पीक घेण्यात मोठा अडसर होतो.

या योजनेमुळे सर्व शेतांपर्यंत योग्य गुणवत्तेचे बारमाही वापरता येतील असे शेत रस्ते, पाणंद तयार करता येणार आहेत. प्रत्येक गावात सरासरी ५ किलोमीटर्सच्या शेत, पाणंद रस्त्यांची गरज आहे.

Share
error: Content is protected !!