धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात : घानवडेतील शेतकऱ्यांचा रास्ता रोकोचा इशारा
कोल्हापूर :
बालिंगा – दाजीपूर रस्त्याच्या अर्धवट कामामुळे घानवडे येथे पावसाळ्यात रस्त्यावर चिखलातून प्रवास करावा लागला. तर सध्या उन्हाळ्यात धुळीचे लोटच्या लोट तयार होऊन ही धूळ नागरिकांच्या घरांमध्ये तसेच ये-जा करणाऱ्या वाहनचालकांच्या अंगावर, कपड्यांवर जात आहे. श्वसनाचे गंभीर आजारासह अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे रस्ते काम सुधारा, अन्यथा रास्ता रोकोचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
भूसंपादन पूर्ण होईपर्यंत रस्ता ज्या स्थितीत पूर्वी होता त्या स्थितीत त्वरित पूर्ववत करून द्यावा, दररोज किमान १ ते ५ वेळा दिवसा टँकरद्वारे पाणी मारण्यात यावे, रस्ता सुरक्षित व सुस्थितीत ठेवावा, भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव नागरिकांच्या वतीने सुरू असून, तोपर्यंत रस्त्याची योग्य व्यवस्था करण्यात यावी. आदी मागण्यांचे निवेदन ग्रामस्थांनी रचना कॅन्स्ट्रक्षनला देऊन मागण्यांची त्वरित दखल न घेतल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
निवेदनावर स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे करवीर सचिव सरदार पाटील,किरण दामूगडे, संग्राम पाटील, महादेव कांबळे, प्रकाश पाटील, सागर पाटील, अरुण पाटील, शिवाजी पाटील, रवींद्र पाटील, सुनील पाटील आदीच्या सह्या आहेत.
