‘गोकुळ’च्या निवडणुकीत ९९.७४ टक्के मतदान; ५,४०४ मतदारांनी बजावला हक्क (करवीर, कागल, गगनबावडा, चंदगडसह सहा तालुक्यांत १०० टक्के मतदान; ५,४१८ पैकी केवळ १४ मतदार मतदानापासून दूर)
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) सन २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी (ता. १८) झालेल्या मतदानात तब्बल ९९.७४ टक्के मतदान झाले. एकूण ५,४१८ मतदारांपैकी ५,४०४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे गोकुळच्या निवडणुकीत मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला.
मतदानाच्या आकडेवारीनुसार, करवीर, कागल, गगनबावडा, चंदगड, पन्हाळा आणि राधानगरी या सहा तालुक्यांत शंभर टक्के मतदान झाले. आजरा तालुक्यात ९९.३४ टक्के, गडहिंग्लजमध्ये ९७.९९ टक्के, भुदरगडमध्ये ९९.६६ टक्के, शाहूवाडीत ९९.७७ टक्के, शिरोळमध्ये शंभर टक्के, तर हातकणंगले तालुक्यात ९९.३८ टक्के मतदानाची नोंद झाली.
तालुकानिहाय आकडेवारीत करवीर तालुक्यातील सर्व ८६५ मतदारांनी मतदान केले. कागलमध्ये ६१९, गगनबावड्यात १३१, चंदगडमध्ये ४२३, पन्हाळ्यात ५१३, राधानगरीत ६९९ आणि शिरोळमध्ये २७० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. आजरा तालुक्यात ३०५ पैकी ३०३, गडहिंग्लजमध्ये ३९९ पैकी ३९१, भुदरगडमध्ये ५९३ पैकी ५९१, शाहूवाडीत ४४० पैकी ४३९ आणि हातकणंगलेमध्ये १६१ पैकी १६० मतदारांनी मतदान केले.
गोकुळच्या या निवडणुकीत एकूण ४,०३२ पुरुष आणि १,३७२ महिला मतदारांनी मतदान केल्याची नोंद आकडेवारीत आहे. एकूण १४ मतदारांनी मतदान केले नसल्याचे दिसून येते. उच्च मतदानाच्या टक्केवारीमुळे गोकुळच्या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले असून, मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने जाणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
