डॉ. बी. पी. रोंगे यांना शिक्षक परिषदेचा जाहीर पाठिंबा!
१५ हजार मतदारांचे संघटनात्मक बळ रोंगेंच्या पाठीशी; विजयाचा विश्वास व्यक्त
पुणे : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार डॉ. बी. पी. रोंगे यांना महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने जाहीर पाठिंबा दिल्याने त्यांच्या उमेदवारीला मोठे बळ मिळाले आहे. पाच जिल्ह्यांतील ५८ तालुक्यांपर्यंत पोहोचलेल्या शिक्षक परिषदेचे संघटनात्मक जाळे आता डॉ. रोंगे यांच्या मदतीला धावून आले असून, निवडणुकीतील चुरस वाढण्याची चिन्हे आहेत.
पुण्यात श्रमिक पत्रकार संघाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे पुणे विभागीय अध्यक्ष सुरेश राठोड यांनी पाठिंब्याची घोषणा केली. चारित्र्यसंपन्न, अनुभवी आणि शिक्षकांच्या प्रश्नांची जाण असलेले नेतृत्व म्हणून डॉ. रोंगे यांची निवड केली असून, त्यांच्या विजयासाठी परिषद प्रयत्नशील राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राठोड म्हणाले, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद ही शिक्षकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणारी राज्यव्यापी संघटना आहे. ‘जिथे शिक्षक, तिथे शिक्षक परिषद’ या भूमिकेतून संघटनेने राज्यभर काम केले आहे. आतापर्यंत परिषदेने १७ उमेदवारांना आमदार म्हणून निवडून आणले आहे. यंदा पुणे विभाग शिक्षक मतदारसंघासाठी डॉ. रोंगे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय त्यांच्या कार्याचा, प्रामाणिकपणाचा आणि शिक्षकांशी असलेल्या बांधिलकीचा विचार करून घेतल्याचे त्यांनी सांगितले.
५८ तालुक्यांत प्रत्यक्ष संवाद :
डॉ. बी. पी. रोंगे म्हणाले, गेल्या दीड वर्षापासून कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांतील ५८ तालुक्यांमध्ये शाळा व महाविद्यालयांना भेटी देऊन शिक्षकांशी प्रत्यक्ष संवाद साधला. शिक्षक, प्राध्यापक, मुख्याध्यापक, प्राचार्य, संस्थाचालक आणि पदाधिकाऱ्यांच्या भेटीतून त्यांच्या समस्या व अपेक्षा समजून घेता आल्या. शिक्षक मतदार नोंदणीपासून वंचित राहू नयेत, यासाठी शेवटच्या दिवसापर्यंत प्रयत्न करून हजारो शिक्षकांची नोंदणी केल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षकांच्या प्रेमामुळे आणि पाठिंब्यामुळे विजय मिळेल, असा विश्वास व्यक्त करतानाच निवडून आल्यानंतर शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची ग्वाही डॉ. रोंगे यांनी दिली.
१५ हजार मतदारांच्या पाठबळाचा दावा :
शिक्षक परिषदेने पाचही जिल्ह्यांमध्ये चाचपणी केली असून, सासवड येथे निर्धार मेळावाही घेतला होता. परिषदेशी संबंधित वैचारिक भूमिका असलेले सुमारे १५ हजार मतदार आणि डॉ. रोंगे यांना वैयक्तिकरीत्या ओळखणारे सुमारे २२ हजार मतदार त्यांच्या पाठीशी असल्याचा दावा राठोड यांनी केला. या पाठबळाच्या जोरावर डॉ. रोंगे यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे पुणे महानगर कार्यवाह विष्णू मोरे, पिंपरी-चिंचवडचे प्रमुख अरुण देवकते आणि ज्येष्ठ सदस्य शिवाजीराव भोसले उपस्थित होते.
