विजयी झाल्यावर जुनी पेन्शनचा प्रश्न कायमचा सोडविणार!:
अपक्ष उमेदवार डॉ. बी. पी. रोंगे ( पुणे शिक्षक मतदारसंघ, शिक्षकांशी प्रत्यक्ष संवादातून प्रश्न सोडविण्याची ग्वाही)
पुणे : राज्यातील शिक्षकांच्या जिव्हाळ्याचा आणि भवितव्याशी निगडित असलेला जुनी पेन्शन योजनेचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी ठोस पाठपुरावा करून शिक्षकांना न्याय मिळवून देणार, असा ठाम विश्वास अपक्ष उमेदवार डॉ. बी. पी. रोंगे यांनी शिक्षकांशी प्रत्यक्ष संवाद साधताना व्यक्त केला.
शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॉ. रोंगे यांनी विविध भागांतील शिक्षकांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि प्रलंबित प्रश्न जाणून घेण्यावर भर दिला आहे. केवळ निवडणुकीपुरते आश्वासन न देता शिक्षकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करण्याची भूमिका त्यांनी मांडली. त्यांच्या या संवादातून शिक्षकांच्या प्रश्नांबाबतची बांधिलकी अधोरेखित होत आहे.
जुनी पेन्शन योजना हा शिक्षकांच्या सामाजिक सुरक्षिततेचा आणि निवृत्तीनंतरच्या सन्मानाने जगण्याचा महत्त्वाचा विषय आहे. अनेक शिक्षक या प्रश्नाकडे आशेने पाहत असून, त्यासाठी प्रभावी नेतृत्व आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांची अपेक्षा व्यक्त करीत आहेत. या पार्श्वभूमीवर डॉ. रोंगे यांनी जुनी पेन्शनचा प्रश्न अग्रक्रमाने हाताळण्याची ग्वाही दिली.
शिक्षण क्षेत्रातील सुमारे ४० वर्षांच्या अनुभवाच्या बळावर शिक्षकांच्या अडचणी, प्रशासकीय प्रश्न आणि शैक्षणिक क्षेत्रातील आव्हानांची आपल्याला जाण आहे. शिक्षकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी त्यांच्याशी थेट संवाद साधणे आणि त्यांच्या मागण्यांना योग्य व्यासपीठावर मांडणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी अनुभव, अभ्यास आणि प्रामाणिक पाठपुरावा या त्रिसूत्रीवर भर देत डॉ. रोंगे यांनी शिक्षकांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. शिक्षक वर्गाचा त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.
