गोकुळच्या सत्तासंघर्षाची उद्या निर्णायक परीक्षा! (मुश्रीफ, महाडिक, सतेज पाटलांसह भाजपची प्रतिष्ठा पणाला; ३५ केंद्रांवर मतदान, सोमवारी मतमोजणी)

कोल्हापूर : राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी उद्या, रविवारी जिल्ह्यातील ३५ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. या निवडणुकीत महायुती विरुद्ध  काँग्रेस समविचारी आघाडी अशी  चुरशीची लढत होत असून, अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

गोकुळच्या २५ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत ५ हजार ४१८ संस्था सभासद मतदानाचा हक्क बजावणार आहेत. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक यांच्यासह काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. 

मतदान प्रक्रियेत मतपत्रिका अवैध ठरू नये, यासाठी मतदारांना मतदान पद्धतीचे प्रशिक्षण दिले जात आहे. सर्वसाधारण गटात २० मते द्यायची असून, निर्धारित संख्येपेक्षा एकही मत अधिक नोंदवल्यास संपूर्ण मतपत्रिका अवैध ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतदारांना अचूक मतदान करण्याबाबत मार्गदर्शन केले जात आहे.

मतदानानंतर सोमवारी सकाळी आठ वाजता शासकीय बहुउद्देशीय हॉल येथे मतमोजणी सुरू होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौगुले यांनी दिलेल्या माहितीनुसार, कायद्यातील तरतुदींनुसार केंद्रनिहाय मतमोजणी केली जाणार असून, त्यासाठी ३५ टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे गोकुळच्या सत्तेची चावी कोणाकडे जाणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Share

You missed

error: Content is protected !!