डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वेरीत बांबू हस्तकला कार्यशाळा संपन्न (महिलांच्या कौशल्य विकासासाठी अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटरचा उपक्रम; प्रशिक्षणातच वस्तूंची विक्री)
पंढरपूर : महिलांच्या पारंपरिक कौशल्यांना व्यावसायिक स्वरूप देऊन त्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीमध्ये एकदिवसीय बांबू हस्तकला कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर (एसीआयसी), स्वेरी पंढरपूर आणि अराईज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. २७ सप्टेंबर) आयोजित या कार्यशाळेत पंढरपूर पंचक्रोशीतील सुमारे ५० महिलांनी सहभाग घेतला.
संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली एसीआयसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष भुतडा यांच्या नेतृत्वात हा उपक्रम राबविण्यात आला. मॅग्निफिसीन्स टोटल गिफ्टिंग सोल्युशन्स एलएलपीच्या संचालिका रश्मी पोंसे व त्यांच्या सहकाऱ्यांनी महिलांना बांबूपासून आकर्षक भेटवस्तू आणि दैनंदिन वापरातील उपयुक्त वस्तू तयार करण्याचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण दिले.
कार्यशाळेत महिलांनी बांगड्यांचे स्टँड, टी-लाईट होल्डर आणि कंदील यांसारख्या वस्तू स्वतः तयार केल्या. विशेष म्हणजे, प्रशिक्षणार्थींनी तयार केलेले बांगड्यांचे स्टँड आणि टी-लाईट होल्डर संबंधित कंपनीने विकत घेतले. त्यामुळे महिलांना प्रशिक्षणासोबतच आपल्या कलाकृतींची विक्री करण्याची संधी मिळाली. कौशल्य प्रशिक्षणातून थेट उत्पन्न मिळविण्याच्या दिशेने पडलेले हे पहिले पाऊल ठरले.
उद्घाटनप्रसंगी आशिष भुतडा यांनी महिलांशी संवाद साधत पारंपरिक कौशल्यांचा विकास करून त्यांना व्यवसायाची जोड देण्याचे आवाहन केले. समारोपप्रसंगी समुदाय संपर्क व्यवस्थापक मधुकर पकाले यांनी भविष्यातील कौशल्यविकास, उद्योजकता आणि रोजगाराभिमुख प्रशिक्षण उपक्रमांची माहिती दिली.महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासह स्थानिक हस्तकलेला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी ही कार्यशाळा महत्त्वपूर्ण ठरली.
