कोल्हापूर :


महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची घोषणा केली आहे. पुणे शिक्षक मतदारसंघातून श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ मुरलीधर गावडे, तर पुणे पदवीधर मतदारसंघातून डॉ. स्मिता योगेश जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने रविवारी उमेदवारांची नावे जाहीर केली. दोन्ही उमेदवारांचा शिक्षण क्षेत्राशी थेट संबंध असल्याने या निवडीकडे विशेष लक्ष लागले आहे. कौस्तुभ गावडे हे स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असून शिक्षक, प्राध्यापक व शैक्षणिक प्रशासनाशी त्यांचा सातत्याने संपर्क राहिला आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघासाठी डॉ. स्मिता जाधव यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्या डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू असून शिक्षण व उद्योग क्षेत्राशी संबंधित आहेत. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश झाला.

पुणे विभागातील शिक्षक व पदवीधर मतदारसंघात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यामुळे दोन्ही मतदारसंघांतील निवडणुकीला पश्चिम महाराष्ट्राच्या राजकीयदृष्ट्या महत्त्व प्राप्त झाले आहे.

Share

By kupe

You missed

error: Content is protected !!