जिथे बार्शी, तिथे सरशी! शिक्षकांच्या प्रश्नांवर अभ्यासपूर्ण भूमिका; डॉ. बी. पी. रोंगे सरांना बार्शीत उत्स्फूर्त प्रतिसाद : टीईटी, जुनी पेन्शनसह प्रलंबित प्रश्न सोडविण्याची ग्वाही; शाळा-महाविद्यालयांना प्रत्यक्ष भेटी देत शिक्षकांशी संवाद
बार्शी : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे वातावरण तापू लागले असताना अपक्ष उमेदवार तथा ‘ज्ञानयात्री’ म्हणून ओळखले जाणारे डॉ. बी. पी. रोंगे सर यांनी बार्शी तालुक्यात शिक्षकांशी थेट संवाद साधला. त्यांच्या भेटींना शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, ‘जिथे बार्शी, तिथे सरशी’ अशी चर्चा शैक्षणिक वर्तुळात रंगू लागली आहे. शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांचा अभ्यास करून ते शासनदरबारी प्रभावीपणे मांडण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरी संस्थेचे संस्थापक व स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. रोंगे यांनी गेल्या दीड वर्षापासून पुणे विभागातील पाचही जिल्ह्यांतील शाळा-महाविद्यालयांना भेटी देत शिक्षक, संस्थाचालक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यावर भर दिला आहे. मतदार नोंदणीपासून निवडणूक प्रक्रियेपर्यंत विविध विषयांवर ते प्रत्यक्ष संवाद साधत आहेत.
बार्शी तालुक्यात त्यांनी शेळगाव ज्युनिअर कॉलेज, जनाबाई जाधव प्रशाला (राळेरास), अर्णव शैक्षणिक संकुल (वैराग) यांसह विविध शैक्षणिक संस्थांना भेटी दिल्या. जय जगदंबा सर्जापूर संस्थेचे अध्यक्ष डॉ. कपिल कोरके यांचीही त्यांनी भेट घेतली. या दौऱ्यात शिक्षकांच्या अडचणी समजून घेत त्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
“शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध”:
“टीईटी, जुनी पेन्शन योजना यांसह शिक्षकांसमोर अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. या प्रश्नांचा मी बारकाईने अभ्यास केला आहे. शिक्षकांनी सेवा करण्याची संधी दिल्यास जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिक प्रयत्नांच्या बळावर हे प्रश्न सोडविण्यासाठी कमी पडणार नाही,” अशी ग्वाही डॉ. रोंगे यांनी दिली.
स्वेरी, एसव्हीआयटी आणि स्वाईप या शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून उभे राहिलेले काम, समस्यांचा सूक्ष्म अभ्यास आणि मुद्देसूद मांडणी यामुळे डॉ. रोंगे यांच्याकडून शिक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. पुणे विभागातील पाच जिल्ह्यांतील ५८ तालुक्यांमध्ये संपर्क वाढवत त्यांनी प्रचारात प्रत्यक्ष भेटींवर भर दिला आहे.
