करवीर :
करवीर तालुक्यातील कसबा बीड - आरे दरम्यान असणाऱ्या बंधाऱ्याला बरगे ( दरवाजे ) घातले नसल्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना शेतीला अपुरा पाणीपुरवठा होत होता. त्यामुळे शेतकऱ्यांकडून या बंधाऱ्यावर बरगे घालण्याची मागणी लक्षात घेऊन पाटबंधारे विभागाकडून येथील बंधाऱ्यावर बरगे घालण्याचे काम पूर्ण करण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त होत आहे.
बंधाऱ्यावर बरगे न घातल्यामुळे पाणी नदीत साठून न राहता खाली वाहून जात असल्याने नदीकाठच्या शेतीला पाण्याची अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते निवास पाटील (महे )व हिंदुराव तिबीले (कसबा बीड) यांनी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्या ज्योती देवकर यांची भेट घेऊन बरगे तातडीने घालण्याची मागणी केली होती तसेच याबाबत पाठपुरावा केला. मागणीची दखल घेत पाटबंधारे विभागाकडून तातडीने कार्यवाही करत जेसीबीच्या साहाय्याने बंधाऱ्यात अडकलेले लाकडी ओंडके, झाडेझुडपे, कचरा बाहेर काढण्यात आला. तसेच कर्मचाऱ्यांच्या मदतीने बरगे घालण्याचे काम पूर्ण करण्यात आले. त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
