राहुल पाटील यांना लागेल ती मदत करणार : हसन मुश्रीफ : महे येथे भैरवनाथ संस्थेचा अमृत महोत्सव उत्साहात, सभासदांना भेटवस्तू वाटप
कोल्हापूर:
राहुल पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यावरच आम्ही सांगितले होते की त्यांना हा निर्णय घेऊन चूक झाली असे वाटणार नाही. त्यांचे सर्व कामे ताकदीने सोडविणार. येणाऱ्या काळात त्यांना लागेल ती मदत करणार असल्याचा विश्वास वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला.
महे (ता. करवीर) येथील भैरवनाथ विकास सेवा संस्थेच्या अमृत अमृत महोत्सवी कार्यक्रमप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी मंत्री हसन मुश्रीफ, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, केडीसीसी बँकेचे संचालक राजेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संस्थेच्या ज्येष्ठ संचालकांचा सत्कार व सभासदांना भेटवस्तूचे वाटप करण्यात आले.
मंत्री हसन मुश्रीफ पुढे म्हणाले म्हणाले, ‘ तुमच्या मनात राहुल पाटील यांच्याबाबतीत जी इच्छा आहे, ती पूर्ण होणार आहे. मी काय परमेश्वर नाही, पण राजकारणात मी बोललेले नेहमी खरे होते. राहुल निश्चित आमदार होतील. उसाच्या उत्पादन घटत आहे. त्यामुळे कारखाने अडचणीत येतील. शेतकऱ्यांनी एआय तंत्राचा वापर करून ऊस उत्पादन वाढीचा प्रयत्न करावा, त्यासाठी आवश्यक ती मदत करू.
राहुल पी. पाटील म्हणाले, स्व. आम. पी एन पाटील यांनी विकास संस्थेच्या बाबतीत कधीही गटतट पाहिला नाही. प्रत्येक संस्थेच्या कामाला प्राधान्य दिले. म्हणूनच साहेब बँकेवर चार वेळा बिनविरोध निवडून गेले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यामुळे आमची कामे होऊ लागली आहेत. या भूमिकेचा कार्यकर्त्यांना फायदाच होतं आहे. जनतेचे प्रश्न सोडविण्याला नेहमीच प्राधान्य देऊ.
यावेळी गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक बाळासाहेब खाडे यांची भाषणे झाली. विकास संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग पाटील यांनी स्वागत केले ततर ज्येष्ठ संचालक सज्जन पाटील यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला.
कार्यक्रमास भोगावती कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील, गोकुळचे माजी संचालक सत्यजित पाटील, शामराव सूर्यवंशी, बाजार समिती संचालक पै. संभाजी पाटील, माजी सभापती पांडुरंग पाटील, शिवाजी कवठेकर, पृथ्वीराज सूर्यवंशी, सरपंच सुवर्णा पाटील, उपसरपंच काजल बोराटे, उपाध्यक्ष सागर कांबळे, बुद्धिराज पाटील आदी उपस्थित होते. आभार जगदीश पाटील यांनी मानले.
