सुट्टय़ांमुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर शनिवारी कोंडी

पुणे :

सुट्टय़ांमुळे पुणे-मुंबईतील पर्यटकांनी लोणावळा, खंडाळा परिसरात गर्दी केली असून मोठय़ा संख्येने पर्यटक मोटारीतून दाखल झाल्याने मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर शनिवारी कोंडी झाली. मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या मार्गिकेवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

शनिवार, रविवार, स्वातंत्र्य दिन तसेच पारशी नववर्षांची सुट्टी जोडून आल्याने पर्यटक मोठय़ा संख्येने लोणावळा, खंडाळा परिसरात दाखल झाले आहेत. पुण्याच्या तुलनेत वर्षांविहारासाठी मुंबईकर मोठय़ा संख्येने दाखल झाले. मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या मार्गिकेवरील वाहतूक कमालीची संथ झाल्याने मोटारींच्या रांगा लागल्याचे पाहायला मिळाले. घाटक्षेत्रात अनेक वाहने बंद पडल्याने कोंडीत भर पडली.

खंडाळा महामार्ग पोलिसांनी कोंडी सोडविण्यासाठी खंडाळा बोगदा येथून मुंबईकडे जाणारी मार्गिका पुण्याकडे येणाऱ्या वाहनांसाठी खुली केली, तरी वाहनांच्या रांगा पाच ते सहा किलोमीटपर्यंत लागल्या. लोणावळा शहरात वाहतूक कोंडी झाली होती. भुशी धरण, ‘लायन्स पॉइंट’कडे जाणाऱ्या रस्त्यावर मोटारींच्या रांगा लागल्याचे पाहायला मिळाले.

द्रुतगती मार्गावर कोंडी झाल्याने वाहनचालक लोणावळा शहरातून जात असल्याने राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कार्ला लेणी, भाजे लेणी, पवना धरण परिसरात पर्यटकांची गर्दी झाली होती. लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ सीताराम डुबल आणि कर्मचाऱ्यांनी कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, मोठय़ा संख्येने मोटारचालक लोणावळा शहरात दाखल झाल्याने स्थानिक नागरिकांसह पर्यटकांना चालणेदेखील अवघड झाले आहे.

Share
error: Content is protected !!