अपडेट : राधानगरी धरणातून 1200 क्युसेक पाण्याचा विसर्ग
दुपारी 4 वाजेपर्यंत 29 बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर ला 8 जुलै पर्यंत रेड अलर्ट व 9 जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी

कोल्हापूर :

जिल्ह्यातील राधानगरी धरणात 87.76 दलघमी पाणीसाठा आहे. आज दुपारी 4 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1200 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून जिल्ह्यातील एकूण 29 बंधारे पाण्याखाली आहेत. घटप्रभा मध्यम प्रकल्प आज दुपारी 1 वाजता पूर्ण क्षमतेने भरला आहे.

पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- हळदी, सरकारी कोगे व राशिवडे, कासारी नदीवरील- वालोली, यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे, पेंडाखळे व बाजारभोगाव, कुंभी नदीवरील- मांडूकली, शेणवडे, कळे व वेतवडे, धामणी नदीवरील- सुळे व अंबार्डे, दुधगंगा नदीवरील- दत्तवाड, तुळशी नदीवरील- बीड व वेधगंगा नदीवरील कुरणी, बस्तवडे, चिखली, निळपण व वाघापूर असे 29 बंधारे पाण्याखाली आहेत.

भारतीय हवामान वेधशाळेच्या अंदाजानुसार
नागरिकांना सावधानतेचा इशारा

भारतीय हवामान वेधशाळेने जिल्ह्याकरिता वर्तवलेल्या अंदाजानुसार 9 जुलै पर्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे. विशेषत: 8 जुलै पर्यंत रेड अलर्ट व 9 जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
जिल्ह्यात याच पध्दतीने पाऊस सुरु राहिला तर पंचगंगा, दूधगंगा, वारणा, हिरण्यकेशी, घटप्रभा, वेदगंगा या सर्व नद्या सद्य: स्थितीत इशारा पातळीपर्यंत दि. 7 जुलै 2022 रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे.

वेधशाळेने दिलेल्या पावसाच्या अंदाजानुसार सर्व नद्यांच्या पाणी पातळीत वाढ संभवत असून पाणी पातळीमध्ये 5 ते 6 फुटांची वाढ होऊन दिनांक 7 जुलै रोजी रात्री 12 वाजेपर्यंत किंवा आधी पाणी पातळी धोका पातळीस पोहचण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील नागरिकांनी या इशाऱ्यानुसार सावधगिरी बाळगावी व शासकीय यंत्रणानी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. जिल्ह्यात सर्वत्र अतिवृष्टी होत असल्याने डोंगराळ भागात भू:स्खलन, दरडी कोसळणे, स्थानिक नाल्यांना पूर येणे अथवा गावठाणातील जुन्या धोकादायक घरांची पडझड अशा घटना संभवत असल्याने नागरिकांनी आवश्यकती खबरदारी घ्यावी, असे आवाहन पाटबंधारे विभागामार्फत करण्यात येत आहे.

Share

You missed

error: Content is protected !!